ग्रामपंचायत सरपंच/सदस्य राजीनामा कार्यपद्धती
Sarpanch/Sadasya Rajinama Format : सरपंच/ग्रामपंचायत सदस्याने पदाचा राजीनामा याची संपूर्ण कार्य पद्धती.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम २९ (२) अन्वये सरपंच/ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यपध्दतीची तरतूद करण्यात आलेली आहे.
कलम
वरील कलमा अंतर्गत राजीनामा मिळाल्यावर सरपंच किंवा यथास्थिती पंचायतीचा सभापती तो सचिवाकडे अग्रेषित करील आणि सचिव पंचायतीच्या पुढील सभेपुढे ठेवील अशी स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे.
राजीनामा
म्हणजेच राजीनामा सुपुर्द केल्याच्या दिनांकापासून ग्रामपंचायतीच्या पुढील सभेपुर्वी संबंधित पदाधिका-याने तो सचिवाकडे अग्रेषित करणे बंधनकारक आहे.
असे असूनही काही प्रकरणी सरपंचांनी दिलेले राजीनामे पंचायत समितीच्या सभापती यांनी सचिवाकडे अग्रेषित न करता प्रदीर्घकाळ स्वतःकडे ठेऊन घेतल्यामुळे अशा राजीनाम्याबाबत पंचायतीच्या पुढील सभेमध्ये निर्णय होऊ शकला नाही असे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
या संदर्भातील कायद्यातील तरतूद अत्यंत सुस्पष्ट असून सरपंच अथवा ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी दिलेले राजीनामे पंचायतीच्या पुढील सभेमध्ये ठेवणे व तद्अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही पंचायतीच्या सचिवांनी करणे अभिप्रेत आहे.
सबब, कायद्यातील या तरतूदीनुसार सरपंच अथवा ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी दिलेले राजीनामे सरपंचाने किंवा यथास्थिती पंचायत समितीच्या सभापतीने कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायतीच्या सचिवांकडे ग्रामपंचायतीच्या पुढील सभेपुर्वी हस्तांतरीत करणे आवश्यक आहे.
प्राप्त झालेले राजीनामे सचिवाकडे हस्तांतरीत न करता ते दीर्घकाळ हेतू परस्सर स्वतःकडे ठेऊन घेण्याची कृती कायद्याचे उल्लंघन ठरेल व अशा कृतीमुळे सरपंच अथवा यथास्थिती पंचायत समितीचा सभापती अपात्रतेच्या कारवाईस पात्र ठरु शकतील. उपरोक्त बाब जिल्हा परिषदेच्या स्तरावरुन सर्व सरपंच तसेच पंचायत समिती सभापती यांच्या निदर्शनास आणण्यात यावी.