ऊस लागवडीसाठी बियाणे कसे निवडावे
How to choose sugarcane varieties : ऊस वाणांची निवड व बियाणे बदल. संबंधित कारखाने यांनी जाहीर केलेल्या परिपत्रक सुचना प्रमाणे हंगामनिहाय वाणांची लागवडीसाठी निवड करावी. ऊस पिकामध्ये बियाणे बदल म्हणजे नवीन जातीचे बियाणे असे नाही. तर आपण ज्या जातीचा ऊस लावणार आहोत त्या जातीचे पायाभूत किंवा प्रमाणित बियाणे वापरून ऊसाची लागण करणे.
बेणे लागवड :
प्रामुख्याने शेतकरी स्वतःचे शेतातीलच, दुस-याचे शेतातील नातेवाईकांकडील ऊसबेणे ऊस लागवडीसाठी वारंवार वापरतात. सदरचे बियाणे पायाभत किंवा प्रमाणीत आहे की नाही? हे शेतक-यास माहित नसते. त्यामुळेउत्पादनात घट येते तसेच किड व रोगांचा प्रसार होतो. बेणे मळयात वाढविलेले ९ ते ११ महिने वयाचे निरोगी रसरशीत आणि अनुवांशिकदृष्टया शुध्द बेणे वापरल्यास ऊस उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. दर ३ वर्षांनी उत्पादन वाढीसाठी कारखाना/ ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील बेणे प्लॉटवरील पायाभत / प्रमाणीत बेणे वापरावे. ऊसाची रोपे लागवड शक्य नसल्यासच बेणे लागवड करावी.
रोपे लागवड :
१) बेणेमळ्यातील शुध्द, निरोगी बेणे वापरुन ट्रेमध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ३० ते ४५ दिवसांची रोपे लागवडीसाठी वापरावीत.
२) ऊस रोपे तयार करताना कांडयांवर बुरशीनाशक किटकनाशक व जिवाणुची बीज प्रक्रिया करावी.
३) ऊस लागणीच्या या पध्दतीमध्ये ६५ टक्के बेणे कमी बेणे लागते
४) ऊस रोपांची संख्या १०० टक्के पर्यंत राखता येते.
५) फुटवे जोमदार येतात व वाढ चांगली होते.
६) रोपे व सरी यामध्ये पुरेसे व एकसमान अंतर ठेवल्याने रोपांना पुरेसा प्रकाश मिळतो, हवा खेळती राहते.
सहाजिकच पिकांची वाढ या पध्दतीत भरघोस व लक्षणिय होते,रोपे लागण पध्दतीने ऊस लागवड केल्यास ऊसांची संख्या ४० ते ५० हजार मिळते आणि ऊसाचे सरासरी वजन २ ते ३ किलोपर्यंत मिळते. एकरी हमखास ७५ टनापेक्षा जास्त उत्पादन मिळविण्यासाठी रोप लागण तंत्राचा वापर करावा,रोप लागण पध्दतीत नेहमीच्या लागणीस ३०-४५ दिवसांपर्यंत जोपासण्यासाठी लागणारे पाणी,तणनियंत्रण, खते, देखरेख यामध्ये बचत होते. रोपे समान वयाची असतात त्यांची वाढ एकसमान होते त्यामुळे त्यांच्यात सारख्या प्रमाणात साखर तयार होते. लागवड करताना खालील प्रमाणे दोन सरीतील व रोपातील अंतर ठेवलेस खालील प्रमाणे रोपे / डोळे आवश्यक आहेत.
सुपर केन नर्सरी :
सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाने ऊस रोपे तयार करणेचे फायदे :
- प्लॅस्टिक पिशव्या, प्लास्टिक ट्रे, कोकोपिट अशा खर्चिक बाबींची गरज नाही.
- खतांची गोणपाटे सच्छिद्र असतात त्यामुळे बेडवर पाणी साठून रोपे पिवळी पडण्याचा धोका नाही.
- गोणपाटामुळे तण बेडवर उगवत नाही.
- कमी खर्चात, निरोगी, जोमदार रोपे स्वतःच्या शेतावर करता येतात.
- बुरशीनाशक व किटकनाशक द्रावणात बेणे तासभर बुडून राहिल्यामुळे ते निरोगी होते.
सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाने ऊस रोपे तयार करणेची पध्दत :
- १० ते ११ महिन्याचे निरोगी ऊसाचा वापर रोपे तयार करण्यासाठी करावा.
- १ डोळयाचे कांडे तयार करावे.
- शेतामध्ये १० फुट लांब, १० फुट रुंद व २ फुट खोल असा खड्डा करावा. त्यामध्ये प्लॅस्टीक कागद अंथरावा. त्यामध्ये ५ किलो चुन्याची निवळी,क्लोरोपायरीपॉस ७०० ते ८०० मिली व बावीस्टीन ७०० ग्रॅम घ्यावे व १ फुट उंचीपर्यंत पाणी भरून घ्यावे व त्याचे द्रावण तयार करावे. त्यामध्ये एक डोळयाचे ऊसाचे बियाणे रात्रभर भिजत ठेवावे.
- खताच्या पिशव्या लांबीच्या दोन्ही बाजूने उसवाव्यात किंवा प्लॅस्टीक कागद घ्यावा. ज्याठिकाणी रोपवाटीका तयार करावयाची आहे तेथील जमीन एकसारखी करून घ्यावी. त्यावर वरील पिशव्यांच्या पट्टया किंवा प्लॅस्टीक कागद अंथरावा. त्यावर तेथील मातीचा २ इंचाचा थर दयावा.
- बिजप्रक्रिया करून रात्रभर भिजलेले बियाणे काढून घ्यावे व निथळल्यावर अॅसिटोबॅक्टर १५० मिली प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणात बियाण्यावर फवारणी करावी. हे प्रक्रीया केलेले बियाणे मातीचे बेडवर एकास एक लागून मांडणी करावी व त्यावर पुन्हा मातीचा थर दयावा. गरजेनुसार दररोज त्यावर पाणी शिंपडावे.
- २० दिवसांनंतर रोपे लागवडीस तयार होतात.
बेणे प्रक्रिया :
अ) ऊस बेणे लागणीपुर्वी १० लिटर पाण्यात डायमेथोएट ३० टक्के प्रवाही२६.५ मि.ली. + १० ग्रॅम कार्बेन्डॅझियमची १० मिनिटांसाठीबेणे प्रक्रीया करावी..
यामुळे बुरशीजन्य रोग व खवले किडीचा बंदोबस्त होतो.
ब) हुमणीचा प्रादुर्भाव असल्यास बिजप्रक्रीयेसाठी इमिडॅक्लोप्रीड ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी वापरून १० मिनिटे बिज प्रक्रिया करावी.
क) अॅसेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक अनुक्रमे १० किलो आणि १.२५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात ऊसाच्या टिप-या ३० मिनिटे बुडवून, नंतर लागण केल्यामुळे नत्रामध्ये ५० टक्के तर स्फुरदखतामध्ये २५ टक्केची बचत होते.